www.24taas.com, अहमदनगर
अवघ्या साडे अकरा हजारात एक हजार स्क्वेअर फुटांचं घर देण्याचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्टाफाश झालाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा करणारा वसंतराव पवार ही बनवाबनवी करत असल्याचं उघड झालंय. परंतू, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षातर्फे अशी कुठलीही योजना राबवण्यात येत नसून याविरोधात दाखल करण्यात आली आहे.
‘राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य प्रायोजित निवारा प्रकल्प’ असं भारदस्त नाव घेऊन अहमदनगर, ठाणे, रायगड, नाशिक आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये एक प्रकल्प सुरू आहे. यात ४०० रुपये सभासद फी आणि ११ हजार ५०० रुपये घराची किंमत अशा अवघ्या १२ हजारांत एक हजार स्क्वेअर फूट जागेवरचं घर देण्याची ही योजना फसवी असल्याचं उघड झालंय. स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी भासवून वसंतराव पवार यानं अनेकांकडून असे लाखो रुपये जमा केलेत.
यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची अशी कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलंय. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे महापालिकेतले विरोधी पक्षनेते विनीत पाऊलबुद्धे यांनी स्पष्ट केलंय. मात्र, आत्तापर्यंत अनेक गोरगरीब जनता या अमिषाला बळी पडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते या प्रकरणात लक्ष घालून लुबाडल्या गेलेल्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातेय.