www.24taas.com, पुणे
अवघ्या दीड दिवसाचं बाळ चोरीला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. हडपसर मधील साने गुरुजी हॉस्पिटलमधून हे बाळ चोरीला गेलंय. पोलीस या बाळाचा शोध घेताहेत. दरम्यान मातृत्वाच्या नात्याचे विविध आणि तितकेच धक्कादायक पैलू पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमधून समोर आले आहेत. ते निश्चितच चिंताजनकही आहेत.
दिनांक - ४ ओगस्ट २०१२ रोजी मुस्कान नावाच्या महिलेनं स्वत:च्या २७ दिवसांच्या मुलीला ओढ्यात सोडलं. कारण होतं... मुलीचं आजारपण... या आजारपणाला कंटाळून या मातेनं हे कृत्यं केलं.
दिनांक - ११ ओगस्ट २०१२ रोजी नुकत्याच जन्मास झालेल्या स्त्री अर्भकाला मुठा नदीकाठच्या झाडीत टाकून दिले. दुसरीही मुलगीच झाली म्हणून आईनंच हे कृत्यं केलं होतं आणि आज, साने गुरुजी हॉस्पिटलमधून एका बाळाची चोरी.
मानवी मनाला हेलावून टाकणाऱ्या या घटना पुण्यात घडल्या आहेत. विद्या सुतार प्रसूतीसाठी साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. रविवारी त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र रात्री त्या झोपेत असताना त्यांच्याजवळील बाळ बेपत्ता झालं. हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून आलेल्या एका महिलेनं हे बाळ चोरल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. एक अनोळखी महिला हॉस्पिटलमध्ये प्रवेश करते आणि बाळ चोरून नेते असा हा प्रकार आहे. हॉस्पिटलमध्ये कोणीही कारण नसताना येऊन राहत असेल तर त्यांची चौकशी याठिकाणी केली जाते की नाही हाही प्रश्न आहे. कारण तो पेशंट बरोबरच संपूर्ण हॉस्पिटलच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
चोरी गेलेलं बाळ सापडणं आणि त्या महिलेवर कायदेशीर कारवाई होणं या अनुषंगिक गोष्टी आहेत. मात्र एकीकडे जन्माला आलेलं बाळ मरणाच्या दारात सोडून दिलं जातंय तर दुसरीकडे बाळ होत नाही म्हणून बाळ चोरलं जातंय, या घटना वेगवेगळ्या. मात्र परस्परांशी संबंध सांगणाऱ्या आहेत. या प्रश्नावर मानसिक तसेच सामाजिक अंगानं विचार होऊन योग्य तोडगा काढला जाणं ही काळाची गरज बनलीय.