`महापौर केसरी`वरून राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्ये कुस्ती

पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेनं निधीची ही तरतूद केली आहे ती, विकास कामांना कात्री लाऊन.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 3, 2013, 11:23 PM IST

www.24taas.com, पुणे
पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेनं निधीची ही तरतूद केली आहे ती, विकास कामांना कात्री लाऊन. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर सर्व असा वाद रंगलाय.
शुक्रवारी होणारी महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जेमतेम तीन तास रंगणार आहे. मात्र, या तीन तासांसाठी महापालिका खर्च करणार आहे तब्बल दीड कोटी... विशेष म्हणजे महापालिका बजेटमध्ये ही स्पर्धा होती फक्त महापौर केसरी. आणि त्यासाठी तरतूद आहे फक्त ५० लाख. मात्र, अचानक ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय झाली. आणि निधीसुद्धा ५० लाखांवरून दीड कोटीवर गेला. आणखी एक कोटी रुपये आले कुठून.... तर त्याचं उत्तर आहे विकासकामांच्या निधीतून.... रस्ते, पाणीपुरवठा अशा विकास कामांचा निधी महापालिकेनं स्पर्धेसाठी वर्ग केला. हा सर्व खटाटोप झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहावरून. आता सगळ्याच पक्षांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करायला सुरुवात केलीय. काँग्रेसनंच या टीकेची सुरुवात केलीय.
भाजप, शिवसेना आणि मनसेचाही विकासकामांचा निधी वळवण्याला विरोध आहे. त्याचबरोबर, या स्पर्धेत पाकिस्तानी मल्ल देखील सहभागी होणार आहेत. त्यांच्यावर लाखोंचा खर्च केला जाणार आहे. पाकिस्तांनी मल्लांवर केल्या जाणा-या खर्चाला आणि त्यांच्या सहभागालाही विरोधाकांनी आक्षेप घेतलाय.
तर दुसरीकडे कितीही विरोध झाला, तरी स्पर्धा होणारच अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय. निधी आणि पाकिस्तानी मल्ल यापुरताच हा वाद मर्यादित नाही. तर, स्पर्धेच्या संयोजनाचं काम पाहणा-या संस्था आणि खाजगी व्यक्ती आणि संस्थांकडून लाखोंचा निधी जमा करतायक, असा गंभीर आरोप होतोय. तसंच, ही स्पर्धा महापालिका हद्दीबाहेर होतेय, आणि संयोजन करणा-या संस्थेला अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा अनुभवच नाही. हे देखील वादाचे विषय आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पैशावर होणारी महापालिका कारभा-यांची कुस्ती सध्या चागलीच गाजतेय.