www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मानवता शून्य कारभाराचं अतिशय संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रतापराव अहिरराव यांनी शहरात इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. पालिका त्यांना या कामात मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती...पण गेली दोन वर्ष पालिकेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना याचा धक्का बसला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
इतिहास संशोधन क्षेत्रात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामध्ये प्रा. प्रतापराव अहिरराव यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. पण पालिका दरबारी मात्र या इतिहास अभ्यासकाला मानहानीच सहन करावी लागली. . महापालिकेनं रौप्य महोत्सवानिमित्त 2007 मध्ये पिंपरी-चिंचवडच्या इतिहासाची माहिती सांगणारं लिखाण करण्याचं काम अहिरराव यांना दिलं. त्यांनी संस्कृतीच्या पाऊलखुणा या शीर्षका अंतर्गत दोन खंडही लिहिले. पण वारंवार हेलपाटे मारुनही या कामाचे दोन लाख रुपये पालिकेनं त्यांना दिलेच नाहीत. इतकंच नाही मंडळाच्या स्थापनेनंतरही पालिकेने त्यांच्या कर्मचा-यांचे पगार दिलेच नाहीत. या मानहानीमुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले...आणि त्यांचं बुधवारी रात्री निधन झालं.
अहिरराव यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या ग्रंथालयासाठी स्वत:ची तीस हजार पुस्तकं दिली होती. आता त्यांच्या जाण्यानंतर तरी आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष द्यावं अशी त्यांच्या घरच्यांची मागणी आहे. अहिररावां सारख्या अभ्यासकाला अशा पद्धतीने वागवणा-या पालिकेबाबत सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय...आता तरी पालिकेला जाग येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.