www.24taas.com, पुणे
देव तारी त्याला कोण मारी! याचा प्रत्यय पुण्यातल्या एका ह्रदयद्रावक घटनेतून शनिवारी आला. प्रत्यक्ष जन्मदात्या मातेनं जन्मत:च मरण्यासाठी सोडून दिलेल्या बाळाला जीवदान मिळालंय. पोलिसांनी याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी होनबोले या निर्दयी मातेला अटक केलीय.
टकमक डोळे फिरवणारी चिमुकली आज जिवंत आहे, हाच मुळी चमत्कार म्हणावा लागेल. मुठा नदी काठच्या झाडीत एक स्त्री अर्भक सापडलं... इतक्यापुरताच हा विषय नाही, या बाळाला एका पोत्यामध्ये गुंडाळून गर्द झाडीत सोडून देण्यात आलं होतं. या परिसरात राहणारे यशवंत वादावणे नदीचं पाणी पाहण्याच्या निमित्तानं नदीकाठी गेले आणि या दुर्दैवी बाळाच्या नशिबाला कलाटणी मिळाली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच यशवंतनं पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी बाळाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात सध्या स्त्री भ्रूण हत्येचा विषय गाजतोय. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्या ही मोठी समस्या आहे. याठिकाणी तर स्त्री भ्रूण नव्हे तर जन्माला आलेली मुलगीच मरणाच्या दारात सोडून देण्यात आली होती. कोथरुडमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी होनबोले या महिलेलला पहिलीही मुलगीच असल्यानं दुसऱ्या नवजात बालिकेची नाळही तुटण्याच्या आत तिला टाकून दिलं. मात्र, तिच्या आयुष्याची नाळ मजबूत होती म्हणून ती बचावली.