www.24taas.com, नाशिक
गेल्याच आठवड्यात आसामच्या चित्रफिती दाखवून जातीय तणाव भडकाविणाऱ्या एका तरुणाला मालेगावात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात दंगली घडविणे सुनियोजित होतं, हे आता स्पष्ट झालंय. मुंबईतील तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दंगलींचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं मालेगाव गेल्या अनेक वर्षांपासून शांत आहे. आसाममध्ये दंगली झाल्यानंतर हे शहर पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आसामातील दंगलीची सीडीवरून दृश्यं दाखवून भावना पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या तरुणाला आझाद नगर पोलिसांनी तातडीनं अटक केली. आक्षेपार्ह सीडी जप्त करत सर्वत्र बंदोबस्त वाढविण्यात आला. मुंबईत झालेल्या घटनेनंतर तर स्वतः विशेष पोलीस महानिरीक्षक मालेगावात ठाण मांडून आहेत.
नाशिक शहरातील अतिसंवेदनशील परिसरातही असाच कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. जुन्या नाशिकमध्ये १८ ठिकाणी विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईतही अशीच काळजी वेळीच घेतली गेली असती तर अनर्थ टळला असता, अशाच प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यात उमटतायत.