www.24taas.com, सातारा
बलात्काराची तक्रार असलेल्या लक्ष्मण माने यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावलीये. शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचा-यांवर बलात्कार केल्याप्रकरणी माने यांच्यावर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांना ९ एप्रिलला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
बलात्काराचे आरोप झालेले उपराकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. तब्बल पंधरा दिवसांनंतर माने सातारा पोलिसांसमोर शरण आलेत. आपण फरार नव्हतोच असं माने म्हणाले. शरण आल्यानंतर मानेंनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय. दोषी असल्यास आपल्याला पुण्यातल्या शनिवारवाड्यासमोर फाशी द्या असंही माने म्हणाले आहेत. आपल्याविरोधात रचलेला हा कट असून आपल्याला अडकवण्यात आले असल्याचा दावा मानेंनी केलाय.
लक्ष्मण माने यांच्याविरोधात अत्याचाराची सहावी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. संबंधित पीडित महिला २००५ पर्यंत जकातवाडीतील आश्रमशाळेत स्वयंपाकीण म्हणून काम करीत होती. जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेत काम करणार्या पाच महिलांनी यापूर्वी मानेंविरोधात अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. शुक्रवारी रात्री आणखी एका महिलेने तक्रार दिल्याने एकूण सहा गुन्हे मानेंविरोधात दाखल झाले आहेत.
मानेंनी `तू माझ्याशी बायकोप्रमाणे वाग, तुझा पगार वाढवतो, तुला परमनंट करतो,` असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे आणि जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.