अनधिकृत रेल्वे बुकिंगवर आता रेल्वेची नजर

दुसऱ्याच्या नावावर आरक्षित तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि ऑनलाईन बुकिंगचा अनधिकृत एजंट घेत असलेला गैरफायदा समोर आल्याने आता आयआरसीटीने त्यावरही वॉच ठेवण्यास सुरूवात केली आहे

Updated: Nov 9, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, पुणे
दुसऱ्याच्या नावावर आरक्षित तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि ऑनलाईन बुकिंगचा अनधिकृत एजंट घेत असलेला गैरफायदा समोर आल्याने आता आयआरसीटीने त्यावरही वॉच ठेवण्यास सुरूवात केली आहे. चारपेक्षा अधिक आरक्षण केल्यास यापुढे आयपी अॅड्रेस ब्लॉक होणार आहे. एकाच आयपी अॅड्रेसवरून एका दिवशी अनेक तिकीटे आरक्षित केली जात असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आल्यानंतर रेल्वेने या कारवाईचा बडगा उगारला आहे.
रेल्वेने सॉफ्टवेअर तयार केले असून, एका आयपी अॅड्रेसवरून एका दिवशी एक ग्राहक जास्तीत जास्त ३ वेगवेगळ्या प्रवासाची तिकीट आरक्षित करु शकतो. नंतर त्या आयपी अॅड्रेसवरून चौथे तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला तर हे सॉफ्टवेअर तो आयपी अॅड्रेस ब्लॉक करतो. पुढील महिनाभर त्यावरून तिकीट आरक्षित करता येत नाही. या नव्या प्रणालीमुळे एजंटामार्फत होणारी अनधिकृत बुकिंग बंद होणार आहे.
तासन् तास रांगेत उभे राहण्याच्या जाचातून सुटका झाल्यामुळे अनेक एजंट्सनीही इंटरनेटच्या मार्गाचा अवलंब करीत या माध्यमातून मोठे दुकान थाटले आहे. परिणामी, सामान्यांना तिकीट मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे.