www.24taas.com,झी मीडिया, कोल्हापूर
भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलिक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.
कोल्हापूर जिल्हयातील अडीच हजार लोकसंख्येचं पिंपळगाव बुद्रुक गांव... या गावातले 10 हून अधिक तरुण सैन्यात भरती. त्यापैकीच एक कुंडलीक माने... वयाच्या 18 व्या वर्षी 1998 ला बेळगांव इथल्या मराठा रेजिमेंटमध्ये ते भरती झाले. तेव्हापासून त्यांनी देशसेवेसाठी वाहून घेतलं. वारकरी कुंटुबातील कुंडलीक सैन्यात भरती होण्याआधी ऊस तोडणी कामगार म्हणून काम करत होते. कुंडलीक यांच्या मागे पत्नी, दहा वर्षांची आरती आणि पाच वर्षांचा अमोल अशी दोन मुलं आणि आई वडील असा परिवार आहे.
अवघ्या 20 दिवसांपूर्वीच कुंडलीक हे आपल्या गावी आले होते. मनमिळाऊ स्वभावाचे कुंडलीक यांनी निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सेवा उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांच्या मित्रांना बोलून दाखवला होता. पण ही इच्छा पूर्ण करण्याआधीच सीमेवर लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
आपल्या गावचा पुत्र देशसेवेसाठी शहीद झाला याचा सार्थ अभिमान पिंपळगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांना आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचं उत्तर भारत सरकारनं द्यावं असंही ग्रामस्थांना वाटतंय. मनाशी स्वप्न बाळगून अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवा हेच आपलं ध्येय मानणारे कुंडलीक देशासाठी शहीद झाले. गावातल्या मुलांसाठी बस सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. झी मीडियाचा कुंडलीकला कडकडीत सलाम.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.