www.24taas.com,झी मीडिया, पुणे
अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अमराठी भाषकांना मराठीचे अध्यापन, ग्रंथ निर्मिती व्यवहार, प्रशासकीय मराठी आणि पटकथा लेखन हे चार पदविका अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जणार आहेत. अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा शिकण्याची संधी निर्माण होण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
अमराठी भाषिकांना मराठी भाषेची ओळख व्हावी यासाठी `अमराठी भाषकांना मराठीचे अध्यपन` हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी इतर पदविका अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.
अमराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये मराठीतून बोलण्याची क्षमता निर्माण करणे, मराठी मजकूर वाचता आणि लिहिता येणे, विद्यार्थ्यांना सरावाने अधिकाधिक भाषाप्रभुत्व मिळवता यावे असा प्रयत्न या अभ्यासक्रमातून केला जाणार आहे.
देवनागरी लिपीचा परिचय, शब्दांचे उच्चारण, अत्यावश्यक शब्दसंग्रहाचा परिचय, वाक्यरचना, वाचनक्षमता निर्मिती आदी अभ्यासघटकांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा असून, त्यासाठी २० जागा आहेत.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.साठी प्रवेश दिला जातो. प्रत्येक देशातील अभ्यासक्रम सारखा नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा घेणे योग्य नाही म्हणूनच परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.