www.24taas.com, अहमदनगर
अहमदनगरमध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या तरुण मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. पित्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी या क्रूर पित्याला अटक केलीय.
अहमदनगरच्या एमआयडीसी कॉलनीत ही दूर्दैवी घटना घडलीय. या पित्याचं नाव किशोर सोनवणे असं आहे. त्यानं हा हल्ला का केला यामागचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाहीय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नाव मीनाक्षी सोनवणे असं आहे ती १७ वर्षांची होती. तर २२ वर्षांचा मुलगा ह्रषिकेश सोनवणे हा मात्र या हल्ल्यातून वाचलाय. पण तो गंभीर जखमी झालाय.
किशोरनं ऋषिकेशवर हल्ला करताना झालेल्या आरडा-ओरडीनंतर किशोरच्या पत्नीला हा प्रकार समजला. त्यानंतर तिने लगेचच पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, किशोरनं हा सर्व प्रकार का केला? याचा पोलीस शोध घेत आहे. प्रथमदर्शनी किशोर हा मनोरुग्ण असल्यानं त्यानं हा गुन्हा केल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र पित्यानेच आपल्या मुलीची अमानुष हत्या केल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. किशोर सोनवणे याला अहमदनगर पोलिसांनी अटक केलीय.