अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण?

पुण्यात सध्या अनधिकृत बांधकामं उध्वस्त करण्याची धडक मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. मात्र या अनधिकृत बांधकामांना राजकारणी आणि महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे ही कारवाई करत असताना त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करतायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2012, 08:44 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात सध्या अनधिकृत बांधकामं उध्वस्त करण्याची धडक मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. मात्र या अनधिकृत बांधकामांना राजकारणी आणि महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे ही कारवाई करत असताना त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करतायत.
तळजाई पठारावरची अनधिकृत इमारत कोसळून ११ जणांचे बळी गेल्यावर महापालिकेला जाग आली आणि अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई सुरु झाली. नागरिक आणि राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरु आहे. शहरातल्या २३०० अनधिकृत इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्यायत. गेल्या १० वर्षात उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतींची संख्या लाखांच्या वर आहे. त्यापैकी १० इमारतींवर गेल्या तीन दिवसात हातोडा पडलाय.

तळजाई दुर्घटनेत काँग्रेसचा माजी नगरसेवक संजय नांदे याचीच ती इमारत होती. त्याला अटकही झालीय. मात्र इतरांचं काय? काँग्रेसच्या संजय नांदेसह राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप, भाजप नगरसेविका वर्षा तापकीर, आमदार भीमराव तापकीर हे या परिसराचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी या परिसरात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठी काय केलं? किंबहुना अशा बांधकामांना त्यांनीच तर अभय दिलं नाही ना, असे प्रश्न विचारले जातायत. महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातले संबधित अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते. तत्कालीन बांधकाम निरीक्षक अन्वर मुल्ला याच्या दुर्लक्षामुळेच अनधिकृत बांधकामं झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे अशा सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत.
ही अनधिकृत बांधकामं सुरू असताना महापालिका झोपली होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. राजकारणी, प्रशासन आणि बांधकाम करणारे अशा सगळ्यांच्या मिलिभगतीतून अनधिकृत बांधकामं फोफावली आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जात असताना संबंधित अधिकारी आणि राजकारण्यांवरही कारवाई झाली पाहिजे. महापालिका ते धाडस दाखवणार का हा आता प्रश्न आहे.