अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
गुन्हेगारांची हातचलाखी सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यांचं हस्तकौशल्य पाहण्याची संधी मिळत नाही. पुण्यातल्या येरवडा कारागृहातल्या कैद्यांच्या कारागिरीचं अनोखं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावून पुणेकरांनीही कैद्यांच्या हस्तकौशल्याला दाद दिलीये.
गुन्हेगार म्हटलं की त्याच्याकडं पांढरपेशी माणूस दोन हात लांबच राहणं पसंत करतो. मात्र या गुन्हेगारांमध्येही एक कलाकार लपलेला असतो. पुण्याच्या येरवडा तुरुंगातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू पाहून याचाच प्रत्यय येतो. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. हस्तकलेचा उकृष्ट नमुना असलेल्या वस्तू प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. कैद्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे.
पुणेकरांनीही कैद्यांच्या कलेला मनापासून दाद दिलीये. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी झाली. कैद्यांनी बनवलेल्य़ा या वस्तू भविष्यात मॉल आणि मोठ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याचा जेल प्रशासनाचा मानस आहे.