www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.
लोकोपयोगी कामांचा धडाका लावणा-या आणि अनधिकृत बांधकामांना चाप लावणा-या गुडेवारांना सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांच्या दादागिरीचा सामना करावा लागला. नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून अखेर त्यांनी पदभार सोडला. त्यावरून आता नागरिकांच्या संतापाचा स्फोट होतोय.
काँग्रेस नगरसेवकांचा निषेध करण्यासाठी महापालिका कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. मात्र गुडेवार यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन मागे घेण्यात आलं. गुडेवारांच्या समर्थनासाठी बसपाने मंगळवारी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. त्याशिवाय आता बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपच्या नेत्यांनी एकत्रितपणे बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.
दरम्यान, गुडेकरांच्या राजीनाम्याची कारणं शोधली जातील आणि राजीनामा मंजूर करायचा की कसे, याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मात्र एवढं महाभारत होऊनही, सत्ताधारी काँग्रेस नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यानं, काँग्रेसचीच भूमिका आयुक्तविरोधी असल्याचं स्पष्ट होतंय.
मिस्टर क्लिन मुख्यमंत्री
`मिस्टर क्लिन` मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगल्या सनदी अधिका-यांची पाठराखण करणार की नाहीत? सोलापूरचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे याबाबत अजून मूग गिळून गप्प का? आमदार प्रणिती शिंदे नेमका कुणाला पाठिंबा देणार? गुंडगिरी करणा-या काँग्रेस नगरसेवकांना की, गुडेवारांसारख्या प्रामाणिक अधिका-याला?
चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूर आयुक्तपदाचा राजीनामा दिल्यानं आता सत्ताधारी काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलंय. मिस्टर क्लिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगल्या अधिका-यांच्या पाठीशी उभे राहणार की नाही? सोलापूरचे नेते सुशीलकुमार शिंदे अजून मूग गिळून गप्प का? गुडेवार राजीनामा प्रकरणी आता तरी ते ब्र उच्चारणार की नाही? आमदार प्रणिती शिंदे कुणाला पाठिंबा देणार? गुंडगिरी करणा-या काँग्रेस नगरसेवकांना की, गुडेवारांसारख्या प्रामाणिक अधिका-याला? याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.