www.24taas.com, पुणे
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मेट्रो स्टेशनच्या जागेबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ज्या ठिकाणाहून मेट्रो सुटणार आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन करायचे की शिवसृष्टी यावरुन या दोन्ही पक्षात जुंपलीय.
सत्तेसाठी एकत्र मात्र निर्णयावरुन नेहमी वाद. हे आघाडी सरकारचं वैशिष्ट पुण्यातही लागू पडतंय. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशनच व्हावं, शिवसृष्टी इतरत्र कुठेही होऊ शकते, अशी अजित पवारांची भूमिका, तर शिवसृष्टी हे कॉंग्रेसनं महापालिका निवडणुकीत दिलेलं आश्वासन असल्याचं सांगत कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टीच होणार. असा मानिकारावांचा दावा. पुणे महापालिकेनं मंजूर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात मेट्रो स्टेशनसाठीचं आरक्षणच दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळं मेट्रो स्टेशनसाठीच जागा नसेल तर मेट्रो धावणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात कोथरूड ते रामवाडी मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कोथरूडमध्ये कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन उभारण्याची योजना आहे. मात्र या जागेवर सिव्हिक सेंटरसाठी आरक्षण ठेवण्यात आलंय. तर याठिकाणी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेनं याआधीच मान्यता दिलीय. त्यामुळं या जागेवर शिवसृष्टी किंवा मेट्रो स्टेशन या दोन्हीपैकी एकच होऊ शकते. अशा परिस्थितीत मेट्रो स्टेशनचे आणि पर्यायाने एकूणच मेट्रो प्रकल्पाचे काय होणार हा प्रश्न कायम आहे. मेट्रो प्रकल्प अतिशय वेगाने मार्गी लावणार असल्याचा दावा सत्ताधारी एका बाजूला करताहेत. दुस-या बाजूला स्टेशनबाबतची संदिग्धता कायम ठेऊन पुणेकरांना अक्षरश: वेडं बनवलं जातंय.
पुण्यातील वाहतूक समस्येवर एक सक्षम तोडगा म्हणून मेट्रो प्रकल्पाकडे पहिलं जातं आहे. मात्र गेली कित्येक वर्षे त्यावर फक्त वाद आणि चर्चेचं गु-हाळं सुरु आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी स्वत: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार लक्ष घालताहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये एक मीटिंगही घडवून आणली होती. मात्र मेट्रो स्टेशनचा प्रश्न सुटल्याशिवाय हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत.