सुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!

हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2012, 06:30 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आय टी पार्क हिंजवडीला भेट दिली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येणा-या या भागाच्या प्रश्नावर सुळे यांनी याआधी इथल्या अधिका-यांशी अनेकवेळा चर्चा केलीय. पण त्यांच्याच बालेकिल्ल्यात चव्हाण यांची ही एन्ट्री म्हणजे सुप्रिया सुळेंना आव्हान असल्याचं बोललं जातंय.
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. ट्रॅफिक जाम, सुरक्षेचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळेच या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय. चव्हाण यांनी हिंजवडीमधल्या आय टी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि आय टी हब चे सर्व प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन दिलं.
सुप्रिया सुळे यांनीही हे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका घेतल्याचं पत्रकारांनी सांगताच, मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या नारायण राणेंनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.
आय टी कंपन्यांच्या पदाधिका-यांनी मात्र कुठल्याही राजकीय वादात न पडता, आमचे प्रश्न सोडवा, असं म्हंटलंय.
मुख्यमंत्र्यांची ही भेट हिंजवडी भागातले प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, ज्या भागात सुप्रिया सुळे जातीनं लक्ष घालतायत, त्याच भागात मुख्यमंत्र्यांची ही भेट राजकीय अर्थ निघायला पुरेशी आहे.