www.24taas.com, झी मीडिया, पुणे
दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय. भीमा नदीत असलेलं हजारो वर्षांपूर्वीचं पळसनाथाचं मंदिर आता दिसू लागलंय.
हे मंदिर जिथं आहे, तिथं कधीकाळी गाव होतं. या गावाचं नाव होतं पळसदेव.. इंदापूरपासून काही किलोमीटर वरचं हे गाव. उजनी धरणाचं काम सुरू झालं आणि इथून हे गाव विस्थापित झालं. धरणाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि यंदा भयानक दुष्काळ पडला..... उजनी धरणातल्या पाण्याची पातळी कमालीची घटली. आणि तब्बल पस्तीस वर्षांनी काळ मागं गेला..... धरणाखालचं हे गाव आणि मंदिर वर आलं. दहाव्या शतकात हे हेमाडपंथी मदिर इथं उभारण्यात आल्याचं इथल्या शीलालेखामुळं स्पष्ट होतं. ज्ञानेश्वरीमध्येही या मंदिराचा उल्लेख "पलाशीतीर्थ" म्हणून करण्यात आलाय. वास्तू कलेचा उत्तम नमुना असलेल हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं आहे. शिखरावर सप्तभूमी पद्धतीचं बांधकाम, समोर भव्य सभामंडप.... सत्तावीस दगडी खांबांच्या मदतीनं मंदिराची उभारणी करण्यात आलीय. शिळांवर आकर्षक अशी शिल्पं आहेत. अलास्कन्या, नागकन्या मदनिका, जल्मोहिनी अशी ही शिल्पं कलाकुसरीचा उत्तम नमुना.. पुष्प, नट, स्तंभ, लवा आणि बेल अशा मंदिराच्या पंचशाखाही सुस्थितीत आहेत.
आज इथे गाव नाही. पण पाण्याच्या लाटा सोसत हे मंदिर आजही उभं आहे. इथल्याच मातीत वाढलेल्या या ग्रामस्थांना धरणासाठी गाव सोडावं लागलं, जमीन सोडावी लागली, पळसनाथाला सोडावं लागलं. पळसनाथाचं मंदिर वर आल्याचं ऐकून पळसदेवचे ग्रामस्थ मोठ्या प्रेमानं दर्शनाला येतायत. गाव वर आल्यानं त्या गावच्या आठवणी जाग्या झाल्यात. गावाचं, मंदिराचं दर्शन घेतल्याचं समाधान आहे पण त्याला दुष्काळाच्या वेदनांची झालर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.