www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरातील टोल विरोधातील आंदोलन काही थांबताना दिसत नाही. आज टोल विरोधातील आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकाळी कोल्हापूर महापालीकेला टेम्पोधारक संघटनेनं घेराव घातला. या आंदोलनामुळे कोल्हापूर महापालीका परिसरात वाहातुकीची मोठी कोंडी झाली होती.
दरम्यान या आदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळतोय. आमरण उपोषणाला बसणा-या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा वाढतेय. उपोषणाला बसणा-या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालवली आहे. यातील अनेकांनी उपचार घेण्यास नाकार दिलाय. तर दिवसभर विविध संघटना, विविध पक्ष, कॉलेजचे विद्यार्थी आंदोलन स्थळी भेटून पाठिंबा देत आहे. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे.
कोल्हापूर महापालीकेच्या पदाधिका-यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुद्द्यावर अऩेक नगरसेवक आक्रमक झालेत. काँग्रेसचे नगरसेवक रवीकिरण इंगवले यांनी तर आपलं नगरसेवक पद गेलं तरी चालेल पण २६ जानेवारीला पालकमंत्र्याना विरोध करुन काळे झेडे दाखवून निषेध नोंदवणार असल्याचं सांगीतलंय. यावरुनच या आंदोलनाची व्याप्ती किती वाढतेय हे दिसुन येतय.
कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार करावा या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून कोल्हापूर महापालिकेसमोर टोल विरोधी कृती समितीच्या सदस्याचं आमरण उपोषण सुरु आहे. यातील चार कार्यकर्त्यांची प्रकृती खालवली असून दोघांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळं आंदोलनस्थळी अस्वस्थता पसरलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.