कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येक शहरात युवतींच्या सदस्य नोंदणीचे आदेश देण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडमध्ये थेट अजित दादांनी पत्र पाठवूनही सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक यशस्वी झालेले नाहीत.
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवती मेळावे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने युवतींना पक्षात सामावण्याचा प्रयत्न केला. त्याला ब-याच ठिकाणी यशही आलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात मात्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सदस्य नोंदणी मात्र फसलेली दिसते...वारंवार सूचना देऊनही नगरसेवकांकडून युवतींची नावनोंदणी झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी थेट शहराध्यक्ष योगेश बहल यांना पत्र पाठवत सदस्य नोंदणी गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले. योगेश बहल यांनी दादाचं पत्र जोडत सर्व नगरसेवकांना १५ फेब्रुवारी पर्यंत सदस्य नोंदणीचे आदेश दिले. पण ८३ अधिकृत आणि तब्बल ९ समर्थक नगरसेवक असे ९१ नगरसेवक असतानाही शहरात युवती राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी यशस्वी झालेली नाही.
शहरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मेळावा घेतल्यानंतर युवती काँग्रेस मध्ये युवती येतील असा विश्वास बहल यांनी व्यक्त केलाय. पण थेट दादाचं पत्र असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात अशी उदासीनता असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत हे मात्र नक्की…