www.24taas.com, पुणे
आज पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय... पुण्यात जवळजवळ सातशे अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला. विशेष म्हणजे पोलिसांना या प्रकाराची माहिती मुलांच्या पालकांकडून मिळाली.
पुण्यातील मुंढवा परिसरातील रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. हॉटेल रिव्हर ह्यूमध्ये अवघ्या आठवी-नववीच्या मुलांची पार्टी सुरू होती. शाळकरी मुलांची ही `दारू पार्टी` आयोजित करण्यात आली होती. पालकांना न जुमानता ही पार्टी आयोजित केली गेली होती. ही मुलं दारूच्या नशेत एवढी अधिन झाली होती की त्यांना कशाचीचं शुध्द नव्हती. स्वतःच्या पालकांनाही ही मुलं जुमानत नव्हती. अखेर हतबल झालेल्या पालकांना पोलिसांना पाचारण कराव लागलं. हा प्रकार सुरू असताना पालकांनीच पोलिसांकडे केली तक्रार दाखल केली. त्यानंतर पुणे सामाजिक विभागानं तत्काळ या प्रकाराची दखल घेत इथं उपस्थित असलेल्या मुलांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी या मुलांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही या मुलांना काबूत आणणं कठीण जात होतं. मात्र, पोलिसांनी कसंबसं या मुलांना काबूत आणलं.
यावेळी जवळपास सातशे मुलं मद्यधुंद अवस्थेत आढळली. अल्पवयीन मुलांसोबत अनेक मुलीही या पार्टीमध्ये हजर होत्या. मुलांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने पोलिसांनी मुलांना सोडून दिलं. या पार्टीच्या आठपैकी दोन आयोजकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल न करता किरकोळ गुन्ह्यांची नोंद करून केवळ १२०० रूपये दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आलयं. तर मुलांचं वय लक्षात घेता त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचं हमीपत्र घेऊन त्यांना सोडून देण्यात आलंय. दरम्यान, पालकांनी या पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
विशेष गोष्ट म्हणजे, ज्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला ते हॉटेल रिव्हर व्ह्यू अजित पवारांचे चुलत भाऊ जयंत पवार यांच्या मालकीचं आहे. आयोजकांवर किरकोळ गुन्हे का दाखल केले, पोलिसांवर राजकिय दबाव होता का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थितं होत आहेत. त्याचबरोबर २१ वर्षांखालील व्यक्तिला दारू पिण्याचा परवाना मिळत नसतानाही या अल्पवयीन मुलांनी दारूचं सेवनं केल होतं.