www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ म्हणजे गैरव्यवहार… असंच जणू समीकरण झालंय. शिक्षण मंडळाचा आणखी एक प्रताप पुढे आलाय. शासकीय दराने लाकडी फर्निचर खरेदी करण्याऐवजी लोखंडी बाकाची खरेदी शिक्षण मंडळ करतंय. सव्वा चार कोटी रुपयांची ही खरेदी आहे. मात्र, त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दर पत्रकापेक्षा तब्बल दीड कोटी रुपये जास्त मोजण्याचा घाट घालण्यात आलाय, असा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला आहे.
लोखंडी बाकांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना थंडी आणि उन्हाळ्यात प्रचंड त्रास होतो, असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे शाळेमध्ये लाकडी बाकांची खरेदी केली जाते. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मात्र टिकाऊच्या नावाखाली लोखंडी बाकाचीच खरेदी करायची आहे. शासकीय दर करारपत्राने ही खरेदी केली असती तर तीन कोटी रुपयात झाली असती. आता मात्र ४.२५ कोटी रुपयांचं टेंडर मागवण्यात आलंय. त्यामुळे वाढीव खर्च कुणासाठी असा प्रश्न ‘सजग नागरिक मंचा’नं उपस्थित केलाय.
नेहमी शासनाच्या ज्या दर पत्रकानुसार खरेदी केली जाते, ती पद्धत इथे का नाही? या प्रश्नावर मात्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांच्याकडे उत्तर नाही.
जिथे टेंडर पद्धतीने काम कमी किमतीत होते तिथे शासकीय दरपत्रक वापरायचं... आणि जिथे दरपत्रकाने काम कमी किंमतीत होते तिथे टेंडर पद्धत वापरायची… असा फॉर्मुला शिक्षण मंडळकडून वापरला जातोय. त्यामुळे ठेकेदारांचे खिसे भरले भरले जात आहेत की आणखी कोणाचे? याची चौकशी महापालिका आयुक्तांनी करण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.