मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पुण्याचे ३ ठार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 17, 2013, 11:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (शनिवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळ सिंहगड कॉलेज घडला. अपघातातील तिघेही मृत तरुण पुण्याचे रहिवासी होते. जखमींवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेतन अतुल बारणे (२२), विनय ढवळे (२१, दोघेही राहणार सोमवार पेठ, पुणे) आणि करण शर्मा (२२, राहणार भवानी पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर विनोद सोनबा सणस आणि पवन परदेशी (सर्व रा. पुणे) हे दोघे जण गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन बारणे आणि त्याच्या चार मित्रांसह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जात होता. दरम्यान, लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इनोव्हा मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे भरधाव मोटारीचा ताबा सुटून ती रस्ता दुभाजकावर आदळली. त्यावेळी समोरून येणा-या एका अज्ञात वाहनाची त्यांच्या मोटारला धडक बसली.
त्यामध्ये चेतन बारणे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी झाले. जखमींना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, विनय आणि करण या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर विनोद आणि पवन दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.