योगेश खरे, www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये छगन भुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.
नाशिकमध्ये भुजबळ फाऊण्डेशनतर्फे २ ते १५ जानेवारी दरम्यान नाशिक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत शहरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांच्या उपस्थितीत अनेक बक्षिसांची लयलूट कऱण्यात आली. याविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे.
आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र गावीत यांच्यासह सात जणांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्ह्यात खुलेआम आचारसंहिताभंग होत असताना आयोगाचे निरीक्षक काय करतात, असा सवाल विचारला जात आहे.
याआधीही आचारसंहिता भंगांच्या तक्रारींची शहानिशाह करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे योग्य ती यंत्रणा नसल्याचं याआधीही उघड झालं आहे. त्याचबरोबर आचारसंहिता लागू झाल्यानंतरही नाशिकमध्ये बड्या राजकीय नेत्यांच्या होर्डिंग्जना अभय मिळाल्याचंही उघड झालं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाचं बोटचेपं धोरण असल्याचीच चर्चा नाशिकमध्ये रंगत आहे.
[jwplayer mediaid="35242"]