पुण्यात राज ठाकरे, अजित पवार यांचा 'रोड शो'

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.

Updated: Feb 8, 2012, 12:12 PM IST

www.24taas.com, पुणे

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.

 

राज ठाकरेंनी मुंबईत रोड शो करून प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर ते आज पुण्यात दिवसभर रोड शो करणार आहेत. त्यामुळं पुण्यातील प्रचारात खऱ्या अर्थाने आजपासून रंगत येणार आहे. राज ठाकरे शनिवारवाड्यापासून रोड शोला सुरूवात करत असून पुणेकरांकडे मतांचा जोगवा मागणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते शहराच्या पूर्वेला प्रचारासाठी फिरणार आहेत. दुपारी राज ठाकरे त्यांच्या पुण्यातल्या घरापासून दुसऱ्या टप्प्याच्या रोड शोला सुरूवात करणार असून शहरातल्या पश्चिम भागातल्या प्रभागांमध्ये ते फिरणार आहेत. राज यांच्या या रोड शोमध्ये त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित आणि मुलगी उर्वशीदेखील सहभागी होणार आहेत.

 

राज यांच्याबरोबरच पुण्यातल्य़ा राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील रोड शो करणार आहेत. साडेअकरा वाजल्यापासून पत्रकार भवन येथून त्यांचा रोड शो सुरु होईल. त्यानंतर सेनादत्त चौक, लोकमान्य नगर, नवी पेठ, जोंधळे चौक, गोगटे प्रशाला, रमणबाग या मार्गानं हा रोड शो जाणार आहे. गणपती मंदीराजवळ अजित पवारांच्या रोड शोची समाप्ती होईल.

 

त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर आज अजितदादा-राजचा सामना चांगलाच रंगणार आहे.