मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी आणि सर्वच पक्षांनी नात्यागोत्यांना तिकीटं दिली आहेत. नाशिकची निवडणूकही याला अपवाद नाही. नाशिक मनपाचं महापौर पद भूषवलेल्यांचे अनेक नातेवाईक सध्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत.
नाशिक महापालिकेचे पहिले महापौर असणाऱ्या स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या मुलीनं काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागितली होती. मात्र ती न मिळाल्यानं अंकिता वावरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. नाशिकचे दुसरे महापौर राहिलेले पंडितराव खैरे यांचे लहान भाऊ शाहू खैरे यांना मात्र काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्षानं आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप अंकिता वावरे यांनी केला आहे.
माजी महापौर आणि माजी मंत्री शोभा बच्छाव यांचे पती काँग्रसकडून लढत आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि आता मनसे असा प्रवास करणारे विद्यमान आमदार आणि माजी महापौर उत्तमराव ढिकले यांच्या मुलाला मनसेची उमेदवारी मिळाली आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांचे भाऊ दिनकर पाटील आणि वहिनी लता पाटील काँग्रेसकडून रिंगणात आहेत. अशोक दिवे यांच्या मुलाला काँग्रेसची तर प्रकाश मते यांच्या मुलाला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे.
भाजपचे माजी महापौर बाळासाहेब सानप, शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे तर मावळत्या सभागृहातल्या महापौर आणि शिवसेनेच्या नयना घोलप स्वतःच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मतदार त्यांना कसा प्रतिसाद ते पहावं लागेल.