शिल्पा शेट्टीच्या मानधनासाठी कलमाडींचा जोर...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पुणे २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप सोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी तब्बल ७१ लाख ७३ हजार रुपये मानधन म्हणून देण्यात आलं होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 5, 2013, 02:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पुणे २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप सोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी तब्बल ७१ लाख ७३ हजार रुपये मानधन म्हणून देण्यात आलं होते. राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या दिल्लीच्या एका न्यायालयानं सोमवारी ही गोष्ट उघड केलीय.
सुरेश कलमाडी यांनी ‘शेवटच्या क्षणी केलेली मागणी’ पूर्ण करण्यासाठी शिल्पा शेट्टी हिला २००८ साली पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोपाच्या सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी ७१.७३ लाख रुपये मानधन म्हणून देण्यात आलं होतं, असं न्यायालयानं म्हटलंय.
राष्ट्रकुल खेळ आयोजन समितीवरून हकालपट्टी करण्यात आलेले तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतरांविरुद्ध हा खटला सुरू आहे. फरीदाबाद स्तथीत ‘जॅम इंटरनॅशनल’चे प्रमोटर पी. डी. आर्य आणि ए. के. मदान यांच्याकडून शिल्पाच्या परफॉर्मन्ससाठी ‘मॅसर्स विज क्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ला ७१.७३ लाख रुपये प्रदान करण्यात आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, न्यायालयानं हे दोघेही आरोपी राष्ट्रकुल घोटाळ्याशी संबंधित असून कलमाडी यांनी जोर दिल्यामुळेच त्यांनी शिल्पाच्या परफॉर्मन्ससाठी ३० ऑक्टोबर २००८ रोजी ही भली मोठी रक्कम मानधन म्हणून दिली असल्याचं स्पष्ट केलंय.

विशेष सीबीआय न्यायाधीश रविंदर कौर यांनी कलमाडी यांच्याव्यतिरिक्त आयोजन समितीचे महासचिन ललित भानोत, आर्य, मदान णि इतरांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचं षडयंत्र रचणं, विश्वासघात आणि अन्य आरोप निश्चित केले. यांसाठी त्यांना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या घोटाळ्यात सरकारला ९० करोड रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय.