www.24taas.com, लंडन
क्रिकेटनंतर आता फुटबॉलमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचे समोर आलं आहे. एक, दोन सामने नव्हे तर तब्बल ६८० फुटबॉल सामने फिक्स असल्याचे युरोपोलने जाहीर केले आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या या खेळावरही फिक्सिंगचा डाग बसला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्येही फिक्सिंगचा खुलासा झाला आहे. जगभरात ज्या खेळासाठी सारेच अक्षरश: वेडावून गेलेले असतात अश्या फुटबॉल ह्या खेळावर फिक्सिंगचे सावट पसरले आहे.
युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-मध्य अमेरिकेत झालेले ६८० सामने फिक्स झाले होते. यातील ३८० सामने हे युरोपात फिक्स झाले. हे सर्व सामने २००८ ते २०११ दरम्यान खेळवले गेले आहेत. यामध्ये विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यांचाही समावेश आहे, असा दावा युरोपोलच्या अधिकाऱ्याने केला आहे. युरोपियन गुन्हेगारीविरोधी संस्था युरोपोलने हा फिक्सिंगचा प्रकार चव्हाट्यावर आणला आहे. ‘संयुक्तपणे केलेल्या चौकशीत १५ देशांमधील एकूण ४२५ भ्रष्ट अधिकारी, खेळाडूंची ओळख पटली आहे.
याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. आम्ही दोषींची नावे सध्या जाहीर करणार नाहीत,’ असे युरोपोलचे प्रमुख रॉब वेनराइट म्हणाले. फुटबॉलच्या या फिक्सिंगचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सिंगापूर आहे. सिंगापूरमधून सर्व काही हालचाली होत असल्याचे या चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे. फिक्सिंगच्या संशयित सामन्यांत अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असल्याची शक्यता आहे. आमच्याकडे एकूण १५० प्रकरणांतील पुरावे आहेत, अशी माहिती जर्मनीचे चौकशी अधिकारी फ्रेंडहेल्म अॅथेल्सने दिली.
प्रत्येक सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी एक लाख युरोंची (७२.२६ लाख) लाच पंच व खेळाडूंना दिली जात होती. ही रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची खास यंत्रणाही तयार केली आहे. यासाठी इंटरनेटचाही वापर केला जात आहे.