स्मिता मांजरेकर, www.24taas.com, मुंबई
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय. या नव्या नाटकाबाबत हे दोघेही खूपच एक्साईटेड आहेत.
या नाटकात कथानकानुसार गाण्यांनाही महत्व देण्यात आलंय. संतोष पवार या नाटकाचं दिग्दर्शन करत असला तरी तो देखिल या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारतोय.आपल्या मुलांचं संगोपन नीट करता यावं यासाठी कविता लाडने रंगमंचावरून एक्झिट घेतली होती मात्र रंगमंचावर आपलं पुनरागमन हे प्रशांतबरोबरचं व्हावं अशीही तिची इच्छा होती...
‘सुंदर मी होणार’ या नाटकतून या दोघांची जोडी जुळली. यानंतर ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एक लग्नाची गोष्ट’, ‘शू कुठं बोलायचं नाही’ यासारख्या नाटकातून ही जोडी सुपरहिट ठरली...’चार दिवस प्रेमाचे’ आणि ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचे या दोघांनी मिळून ८५० प्रयोग केले त्यामुळे ९ वर्षानंतरही ही जोडी तिकिटखिडकीवर हाच हास्यधमाका करते का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल