दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2012, 02:12 PM IST

www.24taas.com,कवी मोरोपंत नगरी,बारामती
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
अखिल भारतीय काँग्रेस-राष्ट्रवादी नाट्यसंमेलनाप्रमाणे बारामतीतील नाट्य संमेलन साजरे झाले. देशभरातील अनेक पवारसमर्थक हे राष्ट्रवादीचे संमेलन असल्यागत गेले दोन दिवस बारामती मुक्कामी पोहोचत होते. शरद पवार यांनी नाट्यसंमेलनात केलेल्या उद्घाटनपर भाषणात प्रथमच मराठी नाटकांवर, नाटकाच्या इतिहासावर, संगीत रंगभूमीवर आणि प्रायोगिक नाटकांवरही विविध उदाहरणांसह भाष्य केले.
या नाट्यसंमेलनात दादा, बाबा आणि काका यांचे नाट्य दिसून आले. मला अर्थ खाते द्या. मग बघा कसा निधी देतो, असे आपल्या नेहमीच्या शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर भाषण करायला उभे राहिलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांना चिमटा काढला. मात्र, हा चिमटा काढत्याना ते दुखावले जाणार नाही, याची काळजी घेत तुम्ही मागताय म्हणून मी अर्थ आणि ऊर्जा खाते दिले, असे सांगून नाट्यसंमेलनात हास्यकल्लोळ निर्माण केला. दादा-बाबांचा कसा रंगला संवाद, ते पाहू.

दादा : नाट्य चळवळ व नाट्यसंगीत जिवंत ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन, पण सध्या मी बिनखात्याचा मंत्री आहे. त्यामुळे मला जर अर्थ खाते दिले तर मी तुम्हाला नक्की मदत देईन.
बाबा : (दादांना उद्देशून) तुम्ही आम्हाला विश्वा्सात न घेता राजीनामा दिला. आम्ही तो स्वीकारला. आताही तुम्ही तुमच्याच मर्जीने उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झालात, पण जे झाले ते जाऊ दे. आता तुम्ही म्हणत आहात तर तुम्हाला तुमचे अर्थ आणि ऊर्जा खाते आम्ही परत देऊन टाकू.
दरम्यान, अजित पवार यांचे काका शरद पवार यांनीही आपण कान टाचण्यात माहीर असल्याचे दाखवून दिले. नाट्यसंमलेनाच्या व्यासपीठावर तिघांचे बोलनाट्य दिसून आले. हे व्यासपीठ नाट्यसंमेलनाचे आहे की राजकीय व्यासपीठ याचीही उपस्थित नाट्य रसिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळाली. पवारांनी काय दिल्या कानपिचक्या?
काका : (यांचे हे भरतवाक्य बाबा आणि दादा या दोघांसाठी) दादांनी राजीनामा दिला. मग आता परत ते मंत्रिमंडळात आले ठिक आहे, पण त्यांना कोणते खाते द्यायचे हे पण तुम्ही ठरवायला लागला. तुमचे (म्हणजे काँग्रेसचे) निर्णय दिल्लीतून होतात. तसे आमचे निर्णय मी स्वत: घेतो. पण असू द्या. दादांनी मागणी केल्यावर तुम्ही ते परत द्यायला निघालाच आहात म्हटल्यावर माझी तुम्हाला खुशाल परवानगी आहे.

या तिघांच्या नाट्यसंवादावर कवी मोरोपंत नगरीत हस्याचे फवारे उडालेत. मात्र, ह हास्याचे फवारे उडत असताना दादांना खडे बोल सुनावलेत. अजितदादा म्हणालेत, रत्नागिरी नाट्यसंमेलनात राज्य शासनातर्फे नाट्य परिषदेला पाच कोटी रुपये जाहीर झाले होते; परंतु परिषदेने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यासंदर्भात आराखडाही सादर केलेला नाही.
मराठी रंगभूमी जगावी म्हणून शासन प्रयत्नशील आहे, पण दुसरीकडे परिषदेची भूमिका उदासीन आहे असे सांगून धोरण आणि मान राखा, असा इशारा परिषदेच्या सदस्यांना अजित पवार यांनी यावेळी दिला.
नव्या रंगकर्मींनी आपल्या तब्येतीला जपावे, झेपतील तेवढेच प्रयोग करावेत. आजचे साचेबद्ध विनोदी नाटक हे नेहमीच धंदा करेल असे नाही, तर गंभीर नाटकेही करावीत. समाजाच्या प्रश्नांनकडेही बघावे. रंगकर्मींनी आकाश मोठे करावे, असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी राजकीय नेत्यांना संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी चिमटा काढला. ते म्हणालेत, शाळेतल्या वर्गातील मॉनिटर निवडला जातो. मात्र गॅदरिंगचा पाहुणा आमंत्रित केला जातो याचे तारतम्य असावे. गाजलेली मराठी नाटके अन्य भाषेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.