www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या पोलिसांना आपल्याच आयुक्तांच्या आदेशाचा विसर पडलाय. चोरीच्या गाड्या वाहन बाजारात विकल्या जात असल्याचं उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.
नाशिक पोलीस आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहन बाजारातल्या वाहन खरेदी-विक्रीची माहिती देणं वाहन बाजार चालकांना बंधनकारक केलं होतं. त्याचबरोबर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना पोलीस ठाण्याच्या हदीतल्या वाहनांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची नोद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र आतापर्यंत किती पोलीस ठाण्यात किती वाहनांच्या व्यवहाराची नोंद करण्यात आलीय, याची माहिती अधिका-यांकडे नाही. आता जे यापुढे वाहन विक्रीची माहिती देणार नाहीत, त्यांचावर गुन्हे दाखल करण्याचं फर्मान पोलीस अधिकाऱ्यांनी सोडलंय.
ग्रामीण भागात चोरीच्या दुचाकींची विक्री करणारी टोळी नुकतीच नाशिक शहर पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडून तब्बल १८ चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्यायत. पण पोलिसांनी कडक भूमिका घेतली नाही, तर अनर्थ घडू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.