मुंबईहून शिर्डीसाठी समुद्रातून विमान

लवकरच शिर्डी आणि महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळ हवाई मार्गाने जोडण्याचा एक महत्त्वाकांशी प्रकल्प राज्याच्या पर्यटन मंत्रालयातर्फे सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला वाव देण्यासाठी राज्यातील छोट्या शहरांमध्येही हवाई सेवा सुरू करण्याची योजना राज्याने आखली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 2, 2013, 05:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
लवकरच शिर्डी आणि महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळ हवाई मार्गाने जोडण्याचा एक महत्त्वाकांशी प्रकल्प राज्याच्या पर्यटन मंत्रालयातर्फे सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला वाव देण्यासाठी राज्यातील छोट्या शहरांमध्येही हवाई सेवा सुरू करण्याची योजना राज्याने आखली आहे.
राज्य सरकारने यासाठी एका खासगी एअरलाइन्स कंपनीशी करार केला असून येत्या एक ते दिड महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई विमानतळापासून दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी एअर टॅक्सी सुरू करण्याची राज्य शासनाची योजना आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी ६-७ तासांचा कालावधी लागतो. परंतु, हे अंतर अर्धा तासात कापण्यासाठी एअर टॅक्सी सुरू करण्याची सरकारची योजना आहे. सुरूवातीला मुंबईतील जुहू येथून शिर्डीसाठी समुद्रात चालणाऱ्या विमानाचा वापर करण्यात येणार आहे. हे विमान जुहूतील समुद्रातून उड्डाण घेऊन शिर्डीजवळ मुळा धरणात लँड होणार आहे.
शिर्डीसह इतर पर्यटन स्थळांसाठीही समुद्रावर चालणारे विमानं वापण्यात येणार आहे. यात जुहू लोणावळा, जुहू लवासा, जुहू अँबी व्हॅली यासाठी ही विमान सेवा असणार आहे. या सर्व ठिकाणी धरणाच्या पाण्यावर हे विमान लँडिंग करणार आहे.
तसेच पश्चिम घाटावरील समुद्र किनारे जसे गणपती पुळे, तारकर्ली आणि हरिहरेश्वर या ठिकाणीही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानाचे भाडे २ ते ३ हजारांच्या आसपास असणार आहे. सी प्लेनने या ठिकाणांचे अंतर १५ ते ४५ मिनिटांमध्ये कापण्यात येईल. सध्या रस्त्याने मुंबईच्या बाहेर पडण्यातच अडीच ते तीन तास लागतात, त्यामुळे ही सेवा खूप सोईस्कर होणार आहे.
तसेच मुंबईतील पर्यटन वाढावे यासाठी एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना राज्य सरकारने तयार केली आहे. या योजनेतंर्गत जुहू एअरपोर्टवरून गिरगाव चौपाटीपर्यंत ही एअर टॅक्सी असणार आहे. यासाठी ११ व्यक्तींची क्षमता असलेले सी प्लेन चालविण्यात येणार आहे. सध्या रहदारीच्या वेळी गिरगावहून अंधेरीला जाण्यासाठी रस्त्याने १ तास लागते. पण, सी प्लेनच्या साह्य्याने हे अंतर १० मिनिटात पार होणार आहे. यासाठी प्रतिव्यक्ती ६०० रुपये भाडे असणार आहे.
पर्यटन वाढविण्यासाठी महाराष्ट्रात चालणार सी प्लेन

मार्ग - भाडे ( अंदाजे एका व्यक्तीसाठी)- समय
> जुहू-शिर्डी 2500 रु 20 मिनिटे
> जुहू-लोणावळा 2000 रु 15 मिनिटे
> जुहू-लवासा 2000 रु 15 मिनिटे
> जुहू-अँबी व्हॅली 2000 रु 15 मिनिटे
> जुहू-गणपती पुळे 2500-3000 रु 45 मिनिटे
> जुहू-तारकर्ली 2500-3000 रु 45 मिनिटे
> जुहू-हरीहरेश्वर 2500-3000 रु 45मिनिटे