जळगावातलं अनोखं लग्न!

जळगावमधल्या सुर्यवंशी दाम्पत्यानंही अशीच प्रतिकुल परिस्थितीवर मात केली. त्यांच्या या जिद्दीची दखल लिम्का बुकनंही घेतलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 27, 2013, 07:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
एखाद्या शारिरीक व्याधीच्या काळ्या सावलीत आयुष्य घालवणारी अनेक उदाहरण आपण सभोवती पाहत असतो. पण काही जिगरबाज मंडळी आपल्या शारिरिक कमतरतेचा बाऊ न करता त्यामधून मार्ग काढतात. जळगावमधल्या सुर्यवंशी दाम्पत्यानंही अशीच प्रतिकुल परिस्थितीवर मात केली. त्यांच्या या जिद्दीची दखल लिम्का बुकनंही घेतलीय.
जळगावचे किशोर सुर्यवंशी यांच्या सात वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. आपल्या भावाला होणारा त्रास पाहून किशोर यांची बहिण आशा यांनी लग्न न करता आपली एक किडनी भावाला दिली. बऱ्हानपूरच्या आरती काशीकर यांचीही अशीच कथा आहे. आरतींच्या आई सुनीता काशीकर यांनी आपली किडनी त्यांना दिली. योगायोगानं या दोघांच्याही किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये झालं. रुग्णालयात एका समान विकारानं एकत्र आलेले हो दोन जीव आधी प्रेमाच्या आणि नंतर विवाहबंधनात अडकले
किशोर आणि आरती यांच्या या सर्व जीवनप्रवासाची माहिती त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवली. त्यानुसार लिम्का बुकनं भारतामधले पहिले किडनी ट्रान्सप्लांट कपल म्हणून त्यांची नोंद केलीय.
किशोर आणि आरती यांनी छाया फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली असून ते आता ज्यांना किडनी नाही त्यांना मार्गदर्शन करतायत. उत्तम गायक आणि गिटार वादक असलेले किशोर इतरांच्या आयुष्याची मैफील बहरावी यासाठी प्रयत्न करतायत. त्यांच्या या अनोख्या जिद्दीला सलाम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.