www.24taas.com, विकास भदाणे, जळगाव
शिक्षण कमी, आर्थिक परिस्थिती हालाखीची तरिही काहीतरी वेगळं करण्याची जिद्द...जळगावातल्या कंडारी गावात जेसीबीवर चालकाचं काम करणा-या संदीप वानखेडेच्या संशोधनाची ही कहाणी..
हे कुठलं खेळणं नाही तर ही आहे पाण्यावर चालणा-या जेसीबीचं मॉडेल... जळगावातल्या कंडारी गावात राहणा-या संदीप वानखेडेंनं ही प्रतिकृती साकारलीय...
संदीप हा सातवी शिकलेला, आर्थिक परिस्थितीही हालाखीचीच..त्यामुळे घराचा गाडा हाकण्यासाठी लहानपणापासूनच संदीपच्या हातात स्टेअरिंग आलं. त्यानं काही काळ जेसीबीचा चालक म्हणूनही काम केलं. त्यावेळी डिझेलऐवजी पाण्यावर जेसीबी चालवता आलं तर, अशी त्याला कल्पना सुचली आणि त्यानं इंजेक्शन, सलाईनची नळी अशा टाकाऊ वस्तूंपासून हवेच्या प्रेशरच्या मदतीने जेसीबीचं मॉडेल तयार केल्याचे संशोधक संदीप वानखेडे याने सांगितले.
गावक-यांसाठी हे मॉडेल म्हणजे सुखद धक्का आहे. इंधनाला सक्षम पर्याय ठरू शकणा-या या मॉडेलचं तज्ज्ञांनी योग्य संशोधन करावं अशी गावक-यांची अपेक्षा आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहे. तसेच हे इंधन कमी होत आहे. त्यामुळे संदीपने केलेल्या संशोधनावर अधिक मेहनत घेतली तर इंधन तुटवड्याचा प्रश्न सुटू शकेल असे संदीपचे शेजारी सुधीर सुर्वे यांनी सांगितले.
आपली आर्थिक, सामाजिक परिस्थिती कशीही असो जर वेगळं काहीतरी करण्याची उमेद असेल तर काही अशक्य नाही हेच या संदीपकडून शिकता येतं. आता त्याच्या संशोधनाचीही योग्य दखल घेतली जावी हिच अपेक्षा..