www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या चार दिवसात २० हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय. प्रशासन मात्र अद्यापही काहीच पावलं उचलताना दिसत नाहीए. कुत्र्याने लचके तोडल्यान या चिमुरड्यांना परीक्षांनाही मुकावं लागतंय.
नाशिकच्या महापलिकेच्या तसंच खासगी रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्याचं प्रमाण वाढलंय... त्याला कारण ठरलंय मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट.. शहरातील सातपूर, सिडको, पूर्व विभाग, पश्चिम विभाग अशा सर्वच विभागात मोकाट कुत्र्यांनी शाळेत जाणाऱ्या, घराजवळ खेळणाऱ्या चिमुरड्यांचे लचके तोडलेत. सध्या या चिमुकल्यांवर उपचार सुरु आहेत. पण एका वेळी चार ते पाच जणांना कुत्रे चावतात आणि प्रशासन यावर काहीच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. याचं मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका दालनात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना कुत्र्यांची भेट ही दिली.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी श्वान निर्बिजीकरण गेल्या अनेक वर्षापसून खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून राबवलं जातंय. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. पण कुत्र्यांची संख्या मात्र वाढतच चाललीय. तर दुसरीकडे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी मोहीम राबवली असल्याचं पालिकेचं म्हणणंय. मात्र सुप्रीम कोर्टाच्या अटींच्या आधीन राहून कामकाज करावं लागत असल्यानं कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याची सबब प्रशासन देतंय.
पाच महिन्यांपूर्वी एकाच दिवशी सातपूर परिसरातील १५ मुलांना कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर केवळ दोन दिवस मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मात्र आता पुन्हा नाशिककर कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरतायत..ह्या चिमुरड्यांना कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांना परीक्षेलाही मुकावं लागलंय. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबादारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होतोय.