नाशिक मनपाचं `कॉपी पेस्ट` अंदाजपत्रक!

नाशिक महापालिकेच्या महासभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मात्र गेल्या अंदाजपत्रकातलीच बहुतेक कामं या अंदाजपत्रकात होती. गेल्या वर्षभरात कुठलंच काम मार्गी लागलं नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2013, 06:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक महापालिकेच्या महासभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मात्र गेल्या अंदाजपत्रकातलीच बहुतेक कामं या अंदाजपत्रकात होती. गेल्या वर्षभरात कुठलंच काम मार्गी लागलं नाही. त्यामुळे हे अंदाजपत्रक म्हणजे कट, कॉपी पेस्ट असल्याचा आरोप होतोय.
सन २०१३- १४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अंतिम मान्यता देताना महापौरांनी या घोषणा केल्यात. स्थायी समितेन सादर केलेल्या २ हजार ३५९ कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला साडेसहा तासाच्या विचारमंथनानंतर मंजुरी देण्यात आली. मात्र या अंदाजपत्रकात नव्या कामापेक्षा जुन्याच कामाचा भरणा अधिक असल्याचं दिसून येतंय. गोदाघाटाचं सुशोभीकरण, वॉटर ऑडिट, बहुमजली पार्किंग, हॉकर्स झोन, फुटपाथ, बोटक्लब, क्रीडांगण विस्तारीकरण, रस्ते बांधणी, मनपाच्या इमारतीला संरक्षक भिंत आणि राष्ट्रपुरुषांची पुतळे उभारणी असे सगळे विषय २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३- १४ च्या अंदाजपत्रकात दिसून येतायंत. त्यामुळे कॉपी पेस्ट अंदाजपत्रक म्हणून टीका होतेय.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 3 कोटी प्राथमिक तरतूद, अभिनव भारत मंदिरासाठी ५० लाख, स्मृतीवनसाठी २५ कोटी, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २०० कोटींची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आलीय. आजवरही अशाप्रकारे मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्यायत. मात्र जमा आणि खर्च याचा ताळमेळ कुठेच बसत नसल्यानं महापालिकेचा आर्थिक गाडा अडखळत चालतोय. त्याला रुळावर आणण्यासाठी महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी विभागासह सर्वच मिळकत विभागाच्या वसुलीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.