www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
सार्वजनिक बांधकाम विअभागाचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक कोर्टात तब्बल हजार पानांच आरोप पत्र दाखल केलंय.
ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच घेताना र्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांना ३० एप्रिल २०१३ या दिवशी रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या चौकशीत चिखलीकरकडे तब्बल १७ कोटी रुपयांची मालमता आढळून आली. तर कार्यकारी अभियंता जगदीश वाघने ८६ लाखरुपयांची माया गोळा केल्याचं उघडकीस आलं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यातच पी. डब्लू. डी. अधिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयांचं घबाड सापडल्यानं राज्यभर हे प्रकरण चांगलंच गाजलं. विरोधकांनी या प्रकरणी थेट भुजबळांना लक्ष करण्याची संधीही सोडली नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने आजवर केलेल्या कारवाईपैंकी सर्वात मोठी कारवाई असल्यानं अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले होते. वर्षभरात सर्व प्रशासकीय मंजुरी आणि तपसणी पूर्ण झाल्यानंतर अखेर चार्जशीट दाखल करण्यात आलं असून लवकरच खटल्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, 'भुजबळ तुमच्यावर चिखल उडाला आहे. तुमचेच्याच खात्याचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, चिखलीकर प्रकरण विधानसभा अधिवेशनातही गाजणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.