www.24taas.com, झी मीडिया, धुळे
काँग्रेससाठी राज्यात सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून धुळ्याकडे पाहीलं जातं. अल्पसंख्याक मतदारांची संख्या इथे जास्त असल्यामुळे यामतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सर्वाधिक सुरक्षित असल्याचं मानलं जातं. आमदार अमरीश पटेल, सत्यजित गायकवाड, इरशाद जहांगिरदार, यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. मराठा समाज आणि मुस्लिम समाज इथे विजयाचं समीकरण निश्चित करतात. २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरीश पटेल यांना अनपेक्षित पराभव पाहावा लागला. मात्र यावेळी त्यांनी जोरदार तयारी केलीय. इच्छूकांमध्ये सर्वाधिक जनसंपर्क पटेलांचा दिसून येतोय.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका मराठा मतदारांनी दिला. यावेळी अल्पसंख्याक समाज उमेदवारीसाठी आग्रही आहे. मतदार संघात अल्पसंख्याक समाजाची मतं चार लाखांच्या घरात आहेत. अल्पसंख्याक समाजाचे नेते इरशाद जहांगिरदार यांनी उमेदवारी मागितली आहे.
आमदार पटेल यांना उमेदवारी दिली तर नंदूरबार लोकसभेची जागा काँग्रेसला राखता येणार आहे. कारण पटेलांचा बालेकिल्ला असलेला शिरपूर तालुका नंदूरबार लोकसभा मतदारसंघात येतो. जहांगीरदार किंवा अपक्ष अशी अल्पसख्यकांची भूमिका आहे तर सत्यजित गायकवाड राहुल ब्रिगेडचे सदस्य आहेत... अशा स्थितीत उमेदवारी कोणाला द्यावी, हा काँग्रेससमोर यक्ष प्रश्न आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.