वाघाच्या शिकारी टोळीचा पर्दाफाश

वाघाची शिकार करणा-या बहेलिया समाजाच्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून, विदर्भात या टोळीने गेल्या काही वर्षात हैदोस माजवत अनेक वाघांचं शिकार केल्याची आता उघडकीस येतंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2013, 07:37 AM IST

www.24taas.com, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर
वाघाची शिकार करणा-या बहेलिया समाजाच्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून, विदर्भात या टोळीने गेल्या काही वर्षात हैदोस माजवत अनेक वाघांचं शिकार केल्याची आता उघडकीस येतंय.
विदर्भात गेल्य़ा दीड वर्षात 22 वाघांचा नैसर्गिक किंवा अन्य कारणांनी मृत्यू झाला. त्यातल्या जवळपास 50 टक्के वाघांची शिकार झाल्याचं उघड झालंय. मध्य प्रदेशातल्या कटनी जिल्ह्यातल्या बहेलिया हा समाज वाघांची शिकार करतो. त्यातल्याच तिघांनी 5 वाघांची शिकार केल्याची कबुली दिलीय. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या एका वाघाचाही समावेश असल्याचे प्रमोद मसराम, विभागीय वन अधिकारी (दक्षता) यांनी सांगितले.
बहेलिया समाजातले लोक वाघाच्या शिकारीसाठी फासे लावतात. वाघ त्यात फसला की दडून बसलेले शिकारी अतिशय क्रूरतेनं वाघाची हत्या करतात. दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या टोळ्या वाघाच्या कातड्याची आणि हाडांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून परदेशात विकतात. चीन आणि हाँगकाँगमध्ये वाघाच्या कातड्यांची आणि हाडांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं ही शिकार होते. वाघाच्या कातडी १० लाखांना तर हाडं प्रति किलो 2 हजार डॉलर किमतीनं विकली जातात.
वन विभागाच्या ताब्यात असलेल्या या 3 शिका-यांकडून वाघांच्या हत्येबद्दल आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.