www.24taas.com, वृत्तसंस्था, अकोला
जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी मशीनमधून महिलेच्या गर्भातील मुलगा-मुलगी निदान करणं शक्य असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं पशुवैद्यकीय रुग्णालयांमधील सोनोग्राफी मशीनवर पीसीपीएनडीटी पथकाकडून वॉच ठेवण्यात येतोय. सोबतच पशुवैद्यकीय रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आले आहेत.
शहरातील पंचायत समितीजवळ असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय आणि पशुसंवर्धन विभागाच्या संशोधन केंद्रातील सोनोग्राफी केंद्रांमध्ये प्रत्येकी एक मशीन आहे. या सोनोग्राफी मशीनवरून गर्भलिंग निदान करण्याचा धोका असल्यानं पीसीपीएनडीटी पथकाकडून हे दोन्ही सोनोग्राफी केंद्र गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आली आहेत. शहरातील या दोन्ही ठिकाणांवरील सोनोग्राफी केंद्रांचा केवळ जनावरांच्या उपचारासाठी उपयोग करण्यात येत असला तरी कुठलाही नियमबाहय़ प्रकार घडू नये यासाठी या केंद्रांची नोंदणी करण्यात आली आहे.
गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भात असलेल्या मुलींची माता-पित्यांकडूनच हत्या करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सुक्षिशित आई-वडिलांकडून करण्यात आलेल्या या कृत्यांमुळं मुलींची संख्या प्रत्येक राज्यात झपाट्यानं कमी झाली. मुलींची संख्या कमी होत असल्यानं आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय बनला होता. या सर्व प्रकाराची तपासणी केल्यानंतर सोनोग्राफी केंद्रांच्या माध्यमातून गर्भलिंग निदान आणि त्यानंतर याच साखळीतील डॉक्टरांकडून गर्भपात करण्याचे प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आलं. या निदर्शनानंतर आरोग्य विभागानं सोनोग्राफी केंद्रासाठी कठोर नियम आणि कायदा करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला. यामुळं गर्भलिंग निदानाला चाप बसला आणि मुलींची संख्या वाढण्यास मदत झाली.
चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटत नाही तोच या क्षेत्रातील माफियांनी गर्भलिंग निदानाचा पुन्हा एक उपाय शोधून काढला. यामध्ये त्यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयांमधील सोनोग्राफी मशीनवरून महिलेच्या गर्भातील मुलगा आणि मुलीचं निदान करण्याचा फंडा वापरून हा गोरखधंदा सुरू केला.
खान्देशातील एका जिल्हय़ात या मशीनद्वारे गर्भातील मुलगा आणि मुलीचे निदान करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आले. त्यामुळे पुन्हा हा प्रकार फोफावण्याची चिन्हे दिसत असतानाच सार्वजनिक आरोग्य विभागाने पशुवैद्यकीय रुग्णालयामधील सोनोग्राफी केंद्र नोंदणीकृत केली आहेत. यामध्ये अकोला शहरातील पशुवैद्यक रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी केंद्रांचा समावेश आहे.
पशुवैद्यकीय संस्थांमध्ये असलेल्या सोनोग्राफी मशीन मानवासाठी असलेल्या सोनोग्राफी मशीनपेक्षा अत्याधुनिक असल्याची माहिती आहे. गर्भलिंग निदानासाठी १० पटीनं अत्याधुनिक या मशीन असून, ही मशीन महिलेच्या पोटावर ठेवताच गर्भातील मुलगा किंवा मुलीचे निदान काही सेंकदांमध्येच होणं शक्य आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.