www.24taas.com, नागपूर
नागपूर येथील अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपाला मारहाणीचे गालबोट लागलं आहे. स्त्री अत्याचारासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संमेलनाच्या समारोपाच्या वेळी मारहाण झाली.
संमेलनाच्या समारोपासाठी ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ढोबळेंनी आपल्या भाषणात स्त्रियांवरील अत्याचाराच्या मुद्दा मांडला होता. समारोपानंचर ते संमेलनस्थळातून बाहेर पडत होते. यावेळी स्त्रिया आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना स्त्रियांवरील अत्याचारांबद्दल प्रश्न विचारले. या प्रश्नावर ढोबळे यांनी दिलेलं उत्तर आक्षेपार्ह असल्याचं सांगत ढोबळे यांच्याशी बाचाबाची केली. ढोबळे समर्थकांनीही ठोबळेची बाजू उचलून धरत घोषणाबाजी केली.
दलित स्त्रीवर अत्याचार झाल्याबद्दल निघालेल्या मोर्चाबद्दल विधान करताना ढोबळे यांनी हा मोर्चा अयोग्य असल्याचं वक्तव्य केलं होतं. पीडित स्त्रीने पोलीसांत तक्रार करण्याऐवजी मुलाला जन्म देऊन भविष्यात न्यायाधीश करावं आणि न्याय मिळवावा, असं विधान ढोबळे यांनी केलं. हे विधान अयोग्य असून यावरून वादाला सुरूवात झाली. याच वादाची परिणती पुढे ढोबळे यांच्या मारहाणीत झाली. मात्र, ही मारहाण राजकीय पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचीही चर्चा आहे.