www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
सरकारला जे जमलं नाही ते जळगावमध्ये केव्हाच शक्य झालंय. जळगावातल्या झुणका भाकर केंद्रात २१ वर्षांपासून अवघ्या १५ रुपयांत पोटभर जेवण मिळतंय.
आम आदमीला अत्यल्प दरात जेवण कसं देता येईल? यावर सध्या सरकार दरबारी खलबतं सुरु आहेत. पण, जळगावात हा प्रयोग मागच्या दोन दशकांपासून यशस्वीपणे सुरु आहे. २१ वर्षांपूर्वी अवघ्या जळगावात क्षुधाशांती हे झुणका भाकर केंद्र सुरु झालं. तेव्हा केवळ एका रुपयांत मिळणारी थाळी या झुणका भाकर केंद्रात २०१३ च्या या महागाईच्या जमान्यातही अवघ्या १५ रुपयांत उपलब्ध होतेय.
वरण, भात, पोळी आणि दोन भाज्या असं बाहेर ६० ते ७० रुपयांत मिळणारं जेवण इथं १५ रुपयांत तुम्हाला मिळू शकतं, असं क्षुधाशांतीचे प्रमुख पदाधिकारी दिलीप चोपडा मोठ्या अभिमानानं सांगतात. हे झुणका भाकर केंद्राने पोटाची भूक भागवण्याचं काम करतंच सोबतच यामुळे जवळजवळ ३५ जणांना कायमस्वरुपी रोजगारही उपलब्ध झालाय.
देशात दररोज उपाशी झोपणाऱ्या कोट्यावधी आम आदमीची भूक कधी भागणार? याचं उत्तर कोणत्या सरकारी योजनेत नाही तर प्रबळ इच्छाशक्तीमध्ये आहे. जळगावमधलं हे झुणका भाकर केंद्र याच इच्छाशक्तीचं एक उदाहारण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.