www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपुरातल्या श्री सुर्या कंपनीनं हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक केलीय. दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत हि कंपनी सर्व सामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीच्या सबबीखाली पैसे घेत होती. केवळ नागपुरातच नाही तर विदर्भातल्या अन्य जिल्ह्यातल्या नागरिकांचीही या कंपनीनं फसवणूक केलीय.हजारो नागरिकांच्या स्वप्नांचा चुराडा करणा-या या कंपनीच्या काळ्या कारभाराचा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट
पेशानं वकील असलेल्या नागपुरच्या बी.एम. करडे यांनी जास्त व्याज मिळेल या अपेक्षेनं नागपुरच्या श्री सूर्या कंपनीत 1 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली होती. संयुक्त परिवारातल्या अन्य सदस्यांसोबत शेती, प्लॉट विकून आणि प्रोव्हीडन्ट फंडाचा मिळालेल्या पैशातून त्यांनी ही गुंतवणूक केली. पण या पैशांवर व्याज मिळत नसल्यानं त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यावेळी आपण फसवले गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. करडे यांच्यासारख्या हजारो गुंतवणूकदारांची अशाच प्रकारे फसवणूक झालीय.
नागपूर पोलिसांनी या प्रकरणात श्री सूर्या कंपनीचे मालक समीर जोशी आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी कंपनीच्या टेलिकॉम नगर भागातील कार्यालयात धाड टाकत महत्वाचे कागदपत्रे गोळा केलीत.
सामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा चुराडा करणा-या श्री सूर्याच्या मालकाला भविष्यात अटक होईल. मात्र जास्त व्याज दराच्या आमिषानं कोणताही विचार न करता आयुष्याची कमाई एखाद्या कंपनीत गुंतवण्यापूर्वी विचार करणं आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.