अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 9, 2014, 01:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.
दरम्यान, आता दत्ता मेघे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येतंय. काँग्रेस पक्षात सतत अपमानजनक वागणूक मिळत असल्यानं आपण, पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचं दत्ता मेघे यांनी म्हटलं होतं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि परत काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार दत्ता मेघे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.
गेले ३५ वर्ष राजकारणात असलेल्या मेघे यांची गेल्या काही वर्षापासून काँग्रेसमध्ये घुसमट होत होती आणि वर्धा जिल्हा आणि लोकसभा मतदार संघातील राजकीय हेव्या-दाव्यामुळंच ते पक्षांतर करीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. देवळीचे काँग्रेस आमदार आणि राज्यमंत्री रणजीत कांबळे आणि दत्ता मेघे यांचे वैर जगजाहीर आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे याचा पराभव झाला होता आणि या पराभवामागे रणजीत कांबळे असल्याची त्यांची भावना जगजाहीर आहे. पक्षात सातत्यानं अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने ते काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.