www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय. हिंदू धर्म संपवण्यासाठीच अंनिसला परदेशातून पैशांचा पुरवठा होतो, असंही त्यांनी म्हटलंय. या विधेयकावर आज चर्चा होणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जादूटोणाविरोधी विधेयक विधानपरिषदेत माडंलं. त्यानंतर कदम यांनी या विधेयकाला विरोध करत अंनिसवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. यावेळी त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हेतूविषयीही शंका उपस्थित केली. यावर, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कदम यांना, हा पैसा परदेशातून आलेला असला तरी तो दाभोलकरांना व्यक्तिगत पुरस्कार स्वरुपात मिळालेला होता, त्यांनीच तो अंनिसच्या कार्यासाठी देणगी स्वरुपात दिला होता, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेनं दाभोलकरांना हा पुरस्कार दिला होता. अमेरिकेतल्या या मराठी संस्थेनं याआधाही अनेक दिग्गजांना पुरस्कार देऊन सन्मानित केलंय, असं स्पष्ट उत्तर दिलंय.
यावर, नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसवर झालेले आरोप खोडसाळ आहेत. अशा प्रकारचे आरोप अंनिस आणि दाभोलकरांच्या कार्याला धक्का पोचवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलीय. ही चर्चा सुरु असताना हमीद दाभोलकर हे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.