बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुरू आहे 'थंडगार हनिमून'

वाढत्या उष्म्यानं सर्वांचाच जीव नकोसा झाला असताना, तिथं बिचा-या वन्यप्राण्यांचेही काय हाल असावेत...मात्र, बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांना उकाड्यातही गारवा मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज असते...भर उष्म्यातला पाहुयात हा एक तजेलदार रिपोर्ट...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 19, 2017, 10:22 PM IST
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुरू आहे 'थंडगार हनिमून'  title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : वाढत्या उष्म्यानं सर्वांचाच जीव नकोसा झाला असताना, तिथं बिचा-या वन्यप्राण्यांचेही काय हाल असावेत...मात्र, बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांना उकाड्यातही गारवा मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज असते...भर उष्म्यातला पाहुयात हा एक तजेलदार रिपोर्ट...

 

 गेल्या काही दिवसांपासून सूर्यनारायण अक्षरशः आग ओकताहेत...पण साधारण सहा महिन्यांपूर्वी चंद्रपूरहून बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आलेल्या बिजली आणि मस्तानी आता चांगल्याच रुळल्याहेत...इथं दोघींची बडदास्तच काही और असते...वाढलेल्या तापमानामुळे सध्या बाहेर उन्हाची भट्टी लागली असताना, या दोन वाघिणींपैकी बिजलीला मात्र पिंज-यांत अंगावर पडणारा पाण्याचा फवारा म्हणजे अक्षरशः जीव का प्राण !!!! तिच्या सोबतीला यश हा वाघ असतोच...
 
 सध्या नॅशनल पार्कमधलं हे 'हॉट कपल' आहे...आणि  गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हनिमून परियड सुरु आहे...बिजलीची मैत्रिण मस्तानीला पिंज-यापेक्षा बाहेर झाडाच्या सावलीत निवांत पडायला आवडतं...तर पिंज-याच्या बाहेर तयार केलेल्या कृत्रिम तलावात लक्ष्मी मनसोक्त डुंबत असते...टायगर सफरीत या सर्व वाघिंणीवर लक्ष ठेऊन असतो तो आनंद... टायगर सफारीत आनंदचा एखाद्या राजासारखा संचार असतो...ही झाली टायगर फॅमिलीची गोष्ट...
 
 आता जरा जंगलाच्या राजाच्या कुटुंबात काय चाललंय ते पाहुयात...तळपत्या उन्हामुळं लायन सफारीतला जेस्पा जास्तवेळ मचाणाच्या सावलीच्याच आश्रयला असतो...तर त्याची बहिण गोपा या उकाड्यातही कुणालाही आव्हान देण्यासाठी सदैव सज्ज असते...तिच्या हालचालीत थकव्याला अजिबात थारा नसतो....

वाघ, सिंहाच्या सोबतीला नॅशनल पार्कमध्ये तब्बल 15 बिबटे आहेत...राज्यातल्या विविध ठिकाणांहून त्यांना इथं आणण्यात आलंय...मानवी वस्त्यांमध्ये घुसल्याचा ठपका असल्यानं ते इथल्या कॅप्टिव्ह  प्लेसमध्ये आहेत... हळूहळू ते या जागेत रुळलेतही...पण सध्या साथीदारांसोबत दिवसा तळपत्या उन्हात खेळण्या-बागडण्यापेक्षा जास्तीत जास्त विश्रांती घेण्याकडे त्यांचा कल असतो...

ख-या अर्थानं वाघाची मावशी मानली जाणा-या आणि अत्यंत दुर्मिळ झालेल्या खारुटी म्हणजे रस्टी कॅट्सही नॅशलन पार्कात आहेत...निशाचर असलेल्या या रस्टीकॅटस् सकाळी पिंज-यातल्या खोपट्यांमध्येच राहाणं पसंत करतात...

नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारताना एखाद-दुसरं हरीण दिसलं नाही तर तुमची वारी फुकटच गेली म्हणा...तापमानाचा पारा वाढत असताना वन्यजीवांनी आपआपल्या परीनं त्यावर उपाय शोधलाय, आणि नॅशनल पार्कमधले अधिकाराही जणू स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेताहेत, हे त्याहूनही विशेष !!!!