पाहा, कोण आहे ‘आप’चं महाराष्ट्रातलं पहिलं टार्गेट...

दिल्लीमध्ये विजयाचा झेंडा रोवल्यानंतर आता आम आदमी पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केलंय. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट नेत्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचा विडा आपनं उचललाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2013, 10:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिल्लीमध्ये विजयाचा झेंडा रोवल्यानंतर आता आम आदमी पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केलंय. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट नेत्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचा विडा आपनं उचललाय.
१२५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या काँग्रेसची मूळं देशाच्या राजधानीतच आम आदमीनं पार उखडून टाकली. आता आम आदमीचं पुढचं लक्ष्य आहे महाराष्ट्र... दिल्लीतल्या अनपेक्षित आणि अभूतपूर्व यशानंतर फॉर्मात असलेल्या ‘आप’नं महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय. ‘स्कॅम फेस्ट’ या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यातल्या नेत्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरण जनतेसमोर मांडण्याचा विडा ‘आप’नं उचललाय आणि या उपक्रमाचं पहिलं टार्गेट आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ... महाराष्ट्र सदन, टोल, एमईटी, इंडिया बुल अशा एकूण १३ प्रकरणांचं सत्य चव्हाट्यावर आणण्यात येणार आहे.
दिल्लीमध्ये लोकांना ‘आप’च्या रुपानं पर्याय मिळाला. पण, महारष्ट्रातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सिंचन घोटाळा उकरून काढणाऱ्या विजय पांढरे यांनी नुकताच ‘आप’मध्ये प्रवेश केलाय. त्यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी याआधीच दर्शवलीय. पांढरेंसारखेच स्वच्छ प्रतिमेचे अनेक अधिकारी ‘आप’च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दिल्ली काबीज केल्यानंतर ‘आम आदमी’ची ताकद सगळ्यांनाच समजून चुकलीय. आता महाराष्ट्रात आप कोणाकोणाची प्रकरणं बाहेर काढणार आणि कुणाच्या विकेट घेणार, याची उत्सुकता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.