शाकाहार X मांसाहार : स्थायी समितीत मनसे-भाजप आमने-सामने

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारीचा मुद्दा गाजला. 

Updated: Aug 31, 2016, 06:47 PM IST
शाकाहार X मांसाहार : स्थायी समितीत मनसे-भाजप आमने-सामने  title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारीचा मुद्दा गाजला. 

गोरेगाव इथल्या श्रीधाम बिल्डर्सने मांसाहार करत असल्याच्या कारणावरून फ्लॅट नाकारल्याचा मुद्दा मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी उपस्थित करत सभा तहकुबी मांडली. अशा प्रकारे घर नाकारणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्याची ठरावाची सूचना मंजूर झालेली असतानाही पालिका अधिकारी गप्प का? असा सवाल उपस्थित करत अशा बिल्डरांच्या मागे पालिकेतील अधिकारी असल्याचा आरोप मनसेनं केला. 

यानंतर भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी मात्र श्रीधाम बिल्डर्सने त्या प्रकल्पात मांसाहार करणाऱ्यांनाही घरे दिल्याचं सांगत घर घेणाऱ्यांची नावे वाचून दाखवली. तसंच मनसे या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळं समितीत मनसे आणि भाजप आमनेसामने आली.

मनसेने मांडलेला सभा तहकुबीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळल्याने मनसे सदस्यांनी सभात्याग करत सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेनं मात्र या मुद्द्याला समर्थन दिलं तरी सभा तहकुबीला विरोध दर्शवला. 

हा प्रकल्प 'एसआरए'चा आहे, त्यामुळं यासंदर्भातील चौकशी करण्याचा अधिकार एसआरएला असल्यानं मुंबई महापालिका एसआरएला पत्र लिहून चौकशीची मागणी करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.