राहुल शेवाळेंच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरेंनी केलं शिक्कामोर्तब?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत मिळतायेत. शनिवारी रात्री उद्धव यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 29, 2013, 11:32 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत मिळतायेत. शनिवारी रात्री उद्धव यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या. दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहुल शेवाळे हेही सहभागी झाले होते. शाखा- शाखांमध्ये उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांनी जोषात स्वागत केलं.
मात्र या दौऱ्यात शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांची गैरहजेरी प्रकर्षानं जाणवली. नुकताच दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन शिवसेनेत जोशी विरुद्ध शेवाळे असा वाद उफाळून आला होता. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच आपण या मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला सुरुवात केल्याचा दावा जोशींकडून केला जातोय.
मात्र ऐन गणेशोत्सवात पोस्टर्सच्या माध्यमातून शेवाळे यांनी याठिकाणी केलेल्या राजकीय शक्तीप्रदर्शनामुळं मनोहर जोशी अस्वस्थ आहेत. शेवाळेंची ही पोस्टरबाजी उद्धव यांच्या संमतीनं झाली होती. त्यातच शनिवारी उद्धव यांनी थेट शेवाळेंची उमेदवारी जाहीर केली नसली तरी शिवसैनिकांना निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान, यावेळी पत्रकारांसोबत बोलतांना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा होणारच असंही म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.