'रिमोटची बॅटरी चार्ज करा'- उद्धव यांचा 'सीएम'ना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'रिमोटची बॅटरी चार्ज करा' असा टोला लगावला आहे. राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असल्याने आम्हाला सहकार्य करा, असं यापूर्वी मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांना म्हणाले होते.

Updated: Jan 25, 2016, 05:07 PM IST
'रिमोटची बॅटरी चार्ज करा'- उद्धव यांचा 'सीएम'ना टोला title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'रिमोटची बॅटरी चार्ज करा' असा टोला लगावला आहे. राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असल्याने आम्हाला सहकार्य करा, असं यापूर्वी मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांना म्हणाले होते.

तसेच 'हाती रिमोट आहे, पण बॅटरी दुसरीकडे असेल, तर काय करायचे' असे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांकडे रिमोट आहे हे खरं असलं, तरी राज्यातील इसिसचा प्रभाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज करावी, असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. 
 
महाराष्ट्रात ‘इसिस’ या भयंकर दहशतवादी संघटनेची पाळेमुळे रुजत आहेत व इसिसने महाराष्ट्रावर झेंडा फडकवण्यासाठी जे कारस्थान रचले आहे तो प्रकार महाराष्ट्राला अस्थिर व असुरक्षित करणारा आहे. 

देशभरात जे ‘इसिस’चे जाळे व बिळे निर्माण होत आहेत त्याचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्र राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्यानेच घ्यायला हवी.  'इसिसचे विष असेच पसरत राहिले तर महाराष्ट्राचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही' असा इशाराही उद्धव यांनी दिला. 

बाकी फडफड आणि धडपड राजकारणात असायचीच, पण महाराष्ट्राची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची असेही त्यांनी म्हटले आहे.