सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

Updated: Oct 22, 2015, 09:52 PM IST
सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत title=

मुंबई: चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आम्ही सोबत आहोत, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही भारतरत्नने सन्मान व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा - मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे - उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवसेना-भाजपामधील वाद शिगेला पोहोचला असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर कधी पडायचं ते आम्ही आमचं बघू असं सांगत तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

शाईफेकीमुळे नाही, दादरीमुळे देशाची मान खाली, उद्धव यांचा घणाघात

शाईफेकीच्या घटनेमुळे नाही, तर दादरीतील हत्याकांडामुळे देशाची मान खाली गेल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. हरियाणात दलित कुटुंबाला जिवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर अशा प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्याच्या बाता झाल्या, मात्र असं हत्याकांड घडतंच कसं, निष्पाप चिमुरड्यांचा बळी जातोच कसा असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुफ्ती मोहम्मद सईदचं ऐकता, मग थोडं शिवसेनेचंही ऐका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आवाहन केलं आहे. तसंच गाईवर चर्चा करण्यापेक्षा महागाईवर चर्चा करा. आम्ही सत्तेत असलो तरी महागाईकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले, आमची बांधिलकी जनतेशी असून सत्तेशी नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

शरद पवारांना सडेतोड उत्तर

सोनिया गांधींसमोर लाचारी पत्कारणाऱ्या शरद पवारांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असं सडेतोड उत्तरही त्यांनी शरद पवारांना दिलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी शिवसैनिकांनी गावागावात मोहीम सुरु करावी असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धारही व्यक्त केला. 

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ़. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण त्यांच्या हत्येसाठी हिंदूत्ववादी संघटनांना जबाबदार ठरवलं जात आहे. गुन्हेगारांना धर्माची लेबलं कशाला लावता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

औरंगाबादचं नाव संभाजीनगरच होणार

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य संपवायला आलेला, त्यामुळे त्याच्या नावाचा आता आपल्याशी काहीही संबंध नाही असं उद्धव म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.